Reddit Premium आणि व्हर्च्युअल वस्तू करार

Reddit इकॉन अटी

24 सप्टेंबर 2024 पासून लागू. 24 सप्टेंबर 2024 रोजी शेवटचे सुधारित केले

स्वागत आहे! Reddit इकॉन अटी (या “इकॉन अटी”) तुम्ही सेवांद्वारे उपलब्ध करून दिलेल्या सशुल्क सेवा आणि Reddit व्हर्च्युअल अर्थव्यवस्थेची इतर वैशिष्ट्ये कशी अ‍ॅक्सेस करू शकता, त्यांची खरेदी कशी करू शकता आणि त्यांचा वापर कसा करू शकता, हे नियंत्रित करतात. या इकॉन अटी तुम्ही आधीच मान्य केलेल्या Reddit वापरकर्ता करार  याला (या “वापरकर्ता करार”) पूरक म्हणून लागू होतात आणि यामध्ये वापरकर्ता करारामध्ये परिभाषित केलेल्या काही अटींचा समावेश आहे.

Reddit Premium किंवा डिजिटल वस्तूंसह—(प्रत्येकाची व्याख्या खाली केली आहे) सशुल्क सेवांचा अ‍ॅक्सेस करून, खरेदी करून किंवा अन्यथा वापर करून, तुम्ही या इकॉन अटींना बांधील राहण्यास सहमत होता. तुम्ही या इकॉन अटींशी सहमत नसल्यास, तुम्हाला सशुल्क सेवांचा अ‍ॅक्सेस करू शकत नाही, खरेदी करू शकत नाही किंवा त्यांचा वापर करू शकत नाही.

1. सशुल्क सेवा आणि पेमेंट माहिती

1.1 अवलोकन

सेवांच्या अनेक बाबींच्या वापरासाठी कोणतेही शुल्क नसले, तरी Reddit सशुल्क सेवांच्या संदर्भात शुल्क आकारते. यामध्ये काही विशिष्ट सदस्यत्वे (“सदस्यत्वे”) आणि काही विशिष्ट डिजिटल अवतार, वस्तू, चलने किंवा आयटम (एकत्रितपणे, “डिजिटल वस्तू”) यांचा समावेश आहे, जे या इकॉन अटींनुसार आणि (लागू असल्यास) आमच्या प्रीव्ह्यू अटी अंतर्गत सेवांद्वारे उपलब्ध करून दिले जातात.

1.2 पेमेंट माहिती

सशुल्क सेवा खरेदी करण्यासाठी तुम्ही आमच्या सेवांद्वारे तुमची डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इतर पेमेंट माहिती (तुमची “पेमेंट माहिती”) सबमिट करू शकता. Reddit काही विशिष्ट पेमेंट पद्धती स्वीकारते, ज्या देशानुसार किंवा सशुल्क सेवेनुसार वेगवेगळ्या असू शकतात. तुमच्या पेमेंट माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी आम्ही तृतीय पक्ष पेमेंट प्रोसेसरचा (उदाहरणार्थ, Apple, Google, Stripe, PayPal इत्यादी) वापर करतो (आमचे “पेमेंट भागीदार”).

तुम्ही पेमेंट माहिती सबमिट केल्यास, तुम्ही पुढील गोष्टींना सहमती दर्शवता:

  • तुमची पेमेंट माहिती खरी आणि अचूक आहे;

  • तुमची पेमेंट माहिती वापरण्यास तुम्ही अधिकृत आहात;

  • तुम्ही देय तारखेपर्यंत सशुल्क सेवांसाठी (लागू असलेले कोणतेही कर, शुल्क आणि खर्च यांसह) पेमेंट कराल;

  • खरेदीची संपूर्ण रक्कम (लागू असलेले कोणतेही कर, शुल्क आणि खर्च यांसह) देय झाल्यावर, तुमची पेमेंट माहिती वापरून सशुल्क सेवांसाठी तुमच्याकडून शुल्क आकारण्याची परवानगी तुम्ही आम्हाला आणि आमच्या पेमेंट भागीदारांना देता;

  • सशुल्क सेवांची तुमची खरेदी प्रक्रिया करण्यासाठी आम्ही तुमची पेमेंट माहिती आमच्या पेमेंट भागीदारांकडे ठेवू आणि त्यांच्यासोबत शेअर करू शकतो; आणि

  • रिन्यूअल, आवर्ती शुल्क आणि तुमच्या खरेदीवर परिणाम करणाऱ्या बदलांशी संबंधित सूचना आणि खुलासे तुम्हाला देण्यासाठी आम्ही तुमची पेमेंट माहिती (आमच्या पेमेंट भागीदारांनी आम्हाला प्रदान केलेली तुमच्याबद्दलची आणि तुमच्या पेमेंट माहितीशी संबंधित कोणतीही माहिती यासह) ठेवू आणि वापरू शकतो.

तुम्ही आमच्या पेमेंट भागीदारांमार्फत कोणत्याही सशुल्क सेवा खरेदी केल्यास, ती खरेदी लागू असलेल्या पेमेंट भागीदारांच्या कायदेशीर अटी आणि गोपनीयता धोरणांच्या अधीन असू शकते. आमच्या पेमेंट भागीदारांमार्फत केलेल्या खरेदींसाठी, तुमचा बिलिंग संबंध थेट लागू असलेल्या पेमेंट भागीदाराशी असेल. सशुल्क सेवांसाठी आकारले जाणारे कोणतेही शुल्क लागू असलेल्या पेमेंट भागीदाराकडून तुम्ही त्या पेमेंट भागीदाराला प्रदान केलेल्या पेमेंट पद्धतीचा वापर करून आकारले जाईल.

1.3 शुल्कांमधील बदल

महत्त्वपूर्ण बदलांची वाजवी आगाऊ सूचना देऊन Reddit वेळोवेळी सशुल्क सेवांशी संबंधित शुल्क किंवा लाभांमध्ये बदल करू शकते. तथापि, सशुल्क सेवांशी संबंधित शुल्कामध्ये तात्पुरती कपात करण्यासह, तात्पुरत्या प्रचारात्मक ऑफरसाठी कोणतीही आगाऊ सूचना देणे आवश्यक असणार नाही.

1.4 तृतीय पक्ष सशुल्क सेवा

तुम्हाला सेवांद्वारे तृतीय पक्ष विक्रेत्यांकडून सदस्यत्वे किंवा इतर डिजिटल वस्तू खरेदी करण्याची अनुमती असू शकते (“तृतीय पक्षाच्या सशुल्क सेवा”). तृतीय पक्षाच्या सशुल्क सेवांच्या प्रत्येक विक्रेत्यासाठी, त्यांच्या वतीने तुमच्याकडून पेमेंट स्वीकारताना Reddit पेमेंट संकलन एजंट म्हणून काम करते. तथापि, लागू असलेल्या तृतीय पक्षाच्या सशुल्क सेवांचे वर्णन करणे आणि त्या उपलब्ध करून देणे यासाठी तृतीय पक्षाच्या सशुल्क सेवांचे विक्रेते जबाबदार आहेत. Reddit तृतीय पक्षाच्या सशुल्क सेवांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवत नाही आणि त्या सेवा प्रदान करणाऱ्या विक्रेत्याची ओळख किंवा त्याने केलेल्या कोणत्याही दाव्यांची वैधता यांची हमी देऊ शकत नाही.

1.5 सवलती आणि भेटवस्तू

Reddit सशुल्क सेवांवर सवलत देऊ शकते आणि प्रत्येक सवलतीच्या विशिष्ट अटी सवलत देण्यात येते त्या वेळी नमूद केल्या जातील. उदाहरणार्थ, तुम्ही अशा कोणत्याही चाचणी कालावधीच्या ऑफरमध्ये सहभागी होत असाल, ज्यामुळे तुम्हाला कोणतेही शुल्क न आकारता सदस्यता वापरता येते, आणि चाचणी कालावधी संपल्यानंतर ती सशुल्क सदस्यतेमध्ये रूपांतरित होत असेल, तर सशुल्क सदस्यतेसाठी शुल्क आकारले जाणे टाळण्यासाठी तुम्ही चाचणी कालावधी समाप्त होण्यापूर्वी सदस्यता रद्द करणे आवश्यक आहे.

Reddit वापरकर्ते सेवांद्वारे इतर Reddit वापरकर्त्यांसाठी काही विशिष्ट डिजिटल वस्तू खरेदी करून त्यांना भेट देऊ शकतात. भेटवस्तू अ‍ॅक्सेस करण्यासाठी किंवा तिचा वापर करण्यासाठी तुमच्याकडून शुल्क आकारले जाणार नाही, पण काही विशिष्ट भेटवस्तू रिडीम करण्यासाठी किंवा वापरण्यासाठी तुम्हाला तुमची पेमेंट माहिती देणे आवश्यक असू शकते.

1.6 परतावा धोरण

सेवांद्वारे तुम्ही खरेदी केलेल्या सशुल्क सेवांचा तुम्हाला तत्काळ अ‍ॅक्सेस आणि वापर करता येतो. त्यामुळे, कायद्याने परवानगी दिलेल्या कमाल मर्यादेपर्यंत, सर्व खरेदी अंतिम असून त्यासाठी परतावा मिळणार नाही आणि खरेदी केलेल्या वस्तू परत करता येणार नाहीत. अंशतः वापरलेल्या बिलिंग कालावधीसाठी आम्ही परतावा देण्यास किंवा जमा रक्कम देण्यास बांधील नाही.

तुम्ही EEA, युनायटेड किंगडम किंवा स्वित्झर्लंडमध्ये राहत असल्यास, तुम्हाला कोणतेही कारण न देता या इकॉन अटींमधून 14 कॅलेंडर दिवसांच्या आत माघार घेण्याचा अधिकार आहे. माघार घेण्याचा कालावधी या इकॉन अटींचा निष्कर्ष काढल्याच्या तारखेपासून 14 कॅलेंडर दिवसांचा आहे. माघार घेण्याचा तुमचा अधिकार वापरण्यासाठी, तुम्ही Reddit कडे  विनंती सबमिट करणे  आवश्यक आहे.

तथापि, कृपया लक्षात घ्या की, तुम्ही अशा सशुल्क सेवा खरेदी करता तेव्हा तुमचा मागे घेण्याचा अधिकार संपुष्टात येतो, ज्यामध्ये: (a) डिजिटल वस्तू वापरण्यासाठीचा परवाना; किंवा (b) सदस्यत्व यांचा समावेश असतो. डिजिटल वस्तू तुमच्या खात्यात जमा झाल्यानंतर किंवा सदस्यत्व सुरू झाल्यानंतर या सशुल्क सेवा तुम्हाला दिल्या जातात आणि तुम्ही या सशुल्क सेवा खरेदी केल्यानंतर त्याच प्रकारे त्या तुम्हाला तात्काळ देण्याची विनंती करता आणि त्यास संमती देता.

1.7 कर आणि शुल्के

Reddit ला तसे करणे आवश्यक असल्यास लागू होणारे कर आणि शुल्क आकारेल, परंतु सेवांचा तुमच्याकडून होणारा वापर आणि सशुल्क सेवांचा अ‍ॅक्सेस, खरेदी व वापर यांच्याशी संबंधित सर्व लागू कर आणि शुल्क भरण्याची जबाबदारी तुमची असेल, यामध्ये व्यवहार कर, डेटा प्लॅन शुल्क, इंटरनेट शुल्क आणि इतर तत्सम खर्चांचा समावेश आहे.

2. सदस्यत्वे

2.1 Reddit Premium

Reddit Premium हे एक सदस्यत्व आहे (“Premium”), जे तुम्हाला सेवांवर विशेष लाभ देते. तुम्ही Premium खरेदी करता तेव्हा, तुम्ही आवर्ती पेमेंट करण्यासाठी आम्हाला अधिकृत करत असल्याचे स्पष्टपणे मान्य करता आणि सदस्यत्व तुम्ही किंवा Reddit कडून रद्द केले जाईपर्यंत, तुम्ही मान्य केलेल्या आवर्ती कालावधीनुसार (मासिक किंवा वार्षिक) पेमेंट माहितीच्या माध्यमातून Reddit ला पेमेंट केले जाईल, यास तुम्ही सहमती देता.

तुम्ही तुमच्या खात्याच्या  वापरकर्ता सेटिंग्ज  मध्ये अ‍ॅक्सेस करून किंवा तुमच्या मोबाइल ॲपद्वारे (तृतीय पक्षामार्फत घेतलेल्या Premium सदस्यत्वांसाठी) तुमचे Premium सदस्यत्व आणि पेमेंट माहिती व्यवस्थापित करू शकता. तुमचे पेमेंट माहितीवर प्रक्रिया आम्ही तुमचे सदस्यत्व सुरू झालेल्या तारखेशी संबंधित कॅलेंडर दिवशी आपोआप करतो. तुमचे सदस्यत्व ज्या दिवशी सुरू होते तो दिवस पुढील महिन्यात नसल्यास, त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी तुमच्याकडून शुल्क आकारले जाईल. कोणत्याही अतिरिक्त तृतीय पक्षाच्या अटींच्या अधीन राहून, मोबाइल रिन्यूअल प्रक्रियेच्या तारखा वेगवेगळ्या असू शकतात.

तुमची पेमेंट माहिती नाकारली गेल्यास, तुम्ही नवीन पेमेंट माहिती देणे आवश्यक आहे; अन्यथा तुमची Premium सदस्यत्व रद्द केले जाईल. तुम्ही नवीन पेमेंट माहिती दिल्यास आणि तुमच्याकडून यशस्वीरीत्या शुल्क आकारले गेल्यास, तुमचा नवीन सदस्यत्व कालावधी यशस्वीरीत्या शुल्क आकारण्यात आलेल्या तारखेवर नव्हे, तर मूळ रिन्यूअलच्या तारखेवर आधारित असेल.

कायदेशीर मराठी अनुवादआम्ही Premium ची किंमत (ऑटो-रिन्यूअलचा भाग म्हणून आकारण्यात येणाऱ्या किंमतीसह) बदलू शकतो; पण कोणत्याही किंमत बदलाची आणि तो बदल लागू होण्याच्या तारखेची तुम्हाला आगाऊ सूचना देऊ. किंमत बदल लागू झाल्याच्या तारखेनंतर Premium चा तुमच्याकडून सुरू असलेला वापर आणि त्याच्याशी संबंधित लाभ मिळवत राहणे, कायद्याने परवानगी दिलेल्या कमाल मर्यादेपर्यंत, नवीन किंमत स्वीकारल्याचे मानले जाईल. तुम्ही पुढील सदस्यत्व कालावधी सुरू होण्याच्या किमान 24 तास आधी तुमचे सदस्यत्व रद्द करून किंमतीमधील बदल नाकारू शकता.

तुम्ही कधीही Premium रद्द करू शकता. तुम्ही तुमचा सदस्यत्व कालावधी संपण्याच्या किमान 24 तास आधी सदस्यत्व रद्द न केल्यास, तुमचे सदस्यत्व आपोआप रिन्यू होईल (प्रत्येक महिन्याला किंवा वर्षाला). तुम्हाला तुमचे सदस्यत्व रद्द करायचे असल्यास, खाली वर्णन केलेल्या सूचनांचे पालन करून तुम्ही आम्हाला सूचित करणे आवश्यक आहे; अन्यथा तुमचे सदस्यत्व आपोआप रिन्यू होईल. तुम्ही सदस्यत्व रद्द न केल्यास, रिन्यू होणाऱ्या सदस्यत्वासाठी तुमच्याकडून शुल्क आकारण्यासाठी आम्हाला तुमची पेमेंट माहिती वापरण्यास तुम्ही अधिकृत करता, ज्यामध्ये सदस्यत्वाच्या रिन्यूअलच्या तारखेला लागू असलेले तत्कालीन सदस्यत्व शुल्क आणि सदस्यत्वावर लागू होणाऱ्या कोणत्याही करांचा समावेश आहे.

तुमचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी, तुमच्या खात्याच्या वापरकर्ता सेटिंग्ज मधील सूचना फॉलो करा. तुम्ही तुमच्या Apple आयडीचा वापर करून Premium खरेदी केले असल्यास, तुम्ही तुमच्या डिव्हाइसच्या खाते सेटिंग्जद्वारे किंवा Apple App Store च्या सदस्यत्वे व्यवस्थापित करा विभागात तुमचे सदस्यत्व रद्द करू शकता. तुम्ही Google Play चा वापर करून Premium खरेदी केले असल्यास, तुम्ही Google Play च्या सदस्यत्वे विभागाला भेट देऊन तुमचे सदस्यत्व रद्द करू शकता.

तुम्ही सदस्यत्व रद्द केल्यापासून तुमचा सध्याचा बिलिंग कालावधी संपेपर्यंत तुमचे सदस्यत्व सक्रिय राहील आणि तुमच्या सध्याच्या बिलिंग कालावधीतील उर्वरित दिवसांसाठी तुम्हाला कोणताही परतावा किंवा क्रेडिट मिळणार नाही. तुम्ही हे मान्य करता की तुमची सदस्यता समाप्त झाल्यावर, Premium शी संबंधित सर्व वैशिष्ट्यांचा अ‍ॅक्सेस तुम्ही गमवाल, यामध्ये Premium साठी विशेष असलेल्या मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध डिजिटल वस्तू जतन किंवा संग्रहित करण्याची सुविधा देणाऱ्या कोणत्याही वैशिष्ट्यांचाही समावेश आहे.

2.2 पूर्वावलोकनाची वैशिष्ट्ये

Reddit  प्रीव्ह्यू अटी या अंतर्गत इतर सदस्यत्वे उपलब्ध करून देऊ शकते. कृपया सध्या कोणती सदस्यत्वे उपलब्ध आहेत (कोणतीही असल्यास) हे पाहण्यासाठी  प्रीव्ह्यू अटी  याचे पुनरावलोकन करा.

3. डिजिटल वस्तू

3.1 Reddit अवतार

Reddit अवतार हे डिजिटल अवतार आहेत, जे तुम्ही सेवांद्वारे कस्टमाइझ करू शकता, त्यांवर दावा करू शकता आणि अन्यथा वापरू शकता आणि ते डिजिटल वस्तूचा एक प्रकार आहेत (“अवतार”). तुमचा अवतार तुमच्या खात्याच्या प्रोफाइल पेजवर आणि संपूर्ण सेवांमध्ये तुमचा अवतार म्हणून दाखवला जातो (उदा, पोस्ट, टिप्पण्या आणि चॅटमध्ये).

प्रत्येक अवताराशी विशिष्ट आणि युनिक गिअर, अ‍ॅक्सेसरी, पोशाख, हेअरस्टाइल, बॅकग्राउंड कार्ड आणि/किंवा इतर आर्ट (“अवतार आर्ट”) संबंधित असते. अवतार आर्टचा परवाना दिला जातो, त्याची विक्री केली जात नाही. Reddit आणि आमचे परवानादाते या इकॉन अटींमध्ये स्पष्टपणे प्रदान न केलेले अवतार आर्टमधील आणि त्यासंबंधीचे सर्व हक्क राखून ठेवतात.

या इकॉन अटी आणि वापरकर्ता करार (कलम 3 सह) यांचे तुम्ही सातत्याने पालन करण्याच्या अधीन राहून, Reddit तुम्हाला तुमच्या अवताराशी संबंधित संपूर्ण किंवा काही भागातील अवतार आर्ट वापरण्यास आणि प्रदर्शित करण्यास, तसेच Reddit आणि त्याचे परवानाधारक यांनी सेवांद्वारे उपलब्ध करून दिलेल्या इतर अवतार आर्टसोबत त्या अवतार आर्टची अदलाबदल करून वापरण्यासाठी हस्तांतरण न करता येणारा, अनन्य नसलेला, रद्द करता येण्याजोगा आणि मर्यादित परवाना प्रदान करते; प्रत्येक बाबतीत, हा परवाना तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक, गैर-व्यावसायिक वापरासाठी, केवळ सेवांच्या आत आणि ज्या खात्याद्वारे तुम्ही तुमचा अवतार सेट केला आहे त्या खात्याशी संबंधित वापरासाठी आहे (“मर्यादित परवानाकृत हक्क”). तुम्ही या इकॉन अटींचे उल्लंघन केल्यास, तुम्ही मर्यादित परवानाकृत हक्क गमवाल.

3.2 Reddit गोल्ड

Reddit गोल्ड हा डिजिटल वस्तूचा एक प्रकार आहे, जो तुम्ही या इकॉन अटींनुसार सेवांवर खरेदी करू शकता, मिळवू शकता आणि वापरू शकता (“गोल्ड”). तुम्ही सेवांद्वारे गोल्ड खरेदी करता तेव्हा, या इकॉन अटी आणि  वापरकर्ता करार  (कलम 3 सह) यांचे तुम्ही सातत्याने पालन करण्याच्या अधीन राहून, Reddit तुम्हाला हस्तांतरण न करता येणारा, अनन्य नसलेला, रद्द करता येण्याजोगा आणि मर्यादित परवाना प्रदान करते, ज्याअंतर्गत तुम्ही गोल्डचा वापर केवळ सेवांच्या आत आणि केवळ ज्या खात्याद्वारे तुम्ही गोल्ड खरेदी केले आहे त्या खात्याशी संबंधित वापरासाठी करू शकता. तुम्ही गोल्डची काही विशिष्ट डिजिटल वस्तूंसाठी (खाली परिभाषित केल्याप्रमाणे, ॲवॉर्डसह) किंवा तृतीय पक्षाच्या सशुल्क सेवांसाठी पूर्तता करू शकता. या इकॉन अटींमध्ये आणि (लागू असल्यास)  प्रीव्ह्यू अटी मध्ये स्पष्टपणे नमूद केलेल्या उद्देशांव्यतिरिक्त इतर कोणत्याही उद्देशासाठी गोल्ड वापरण्याचा तुम्ही प्रयत्न करू नये.

3.3 Reddit ॲवॉर्ड

Reddit ॲवॉर्ड हा डिजिटल वस्तूंचा एक प्रकार आहे, जो तुम्ही सेवांद्वारे मिळवू शकता (उदा., गोल्ड खर्च करून किंवा प्रचारात्मक ऑफरदरम्यान) आणि इतर Reddit वापरकर्त्यांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी आणि त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी त्यांना देऊ शकता (उदा. पोस्ट आणि टिप्पण्या) सेवांवर (“ॲवॉर्ड”). तुम्ही सेवांद्वारे ॲवॉर्ड देता तेव्हा, या इकॉन अटी आणि  वापरकर्ता करार (कलम 3 सह) यांचे तुम्ही सातत्याने पालन करण्याच्या अधीन राहून, Reddit तुम्हाला हस्तांतरित न करता येणारा, अनन्य नसलेला, रद्द करता येण्याजोगा आणि मर्यादित परवाना प्रदान करते, ज्याअंतर्गत तुम्ही ॲवॉर्डचा वापर करू शकता आणि तो इतर Reddit वापरकर्त्यांना भेट म्हणून देऊ शकता, पण केवळ सेवांच्या आत आणि केवळ ज्या खात्याद्वारे तुम्ही ॲवॉर्ड खरेदी केला आहे त्या खात्याशी संबंधित वापरासाठी करू शकता.

(इतर Reddit वापरकर्त्यांकडून) ॲवॉर्ड मिळवणारे, काही विशिष्ट Reddit कार्यक्रमामध्ये ( प्रीव्ह्यू अटी यांमध्ये परिभाषित केल्याप्रमाणे) सहभागी होण्यासाठी पात्र ठरू शकतात आणि लागू असलेल्या Reddit कार्यक्रम अटींनुसार ( प्रीव्ह्यू अटी यांमध्ये परिभाषित केल्याप्रमाणे), सेवांवरील त्यांच्या योगदानाच्या आधारे गोल्ड आणि/किंवा पैसे कमवू शकतात. तथापि, ॲवॉर्ड मिळवणारे सर्व मिळवणारे Reddit कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि आर्थिक लाभ मिळवण्यासाठी पात्र असतीलच असे नाही. परिणामी, मिळवणाऱ्याला मोबदला किंवा आर्थिक साहाय्य देण्यासाठी ॲवॉर्ड किंवा गोल्ड यापैकी कोणत्याही गोष्टीचा हमी असलेले साधन म्हणून वापर करण्याचा हेतू नाही.

3.4 भेटवस्तू अंतिम

इतर वापरकर्त्यांना दिलेल्या डिजिटल वस्तू परत केल्या जाणार नाहीत (उदा., तुम्ही दुसऱ्या वापरकर्त्याला ॲवॉर्ड भेट देण्यासाठी गोल्डचा वापर केल्यास, तुम्ही ते ॲवॉर्ड परत घेऊ शकत नाही किंवा त्यासाठी खर्च केलेले कोणतेही गोल्ड परत मिळवू शकत नाही).

3.5 पूर्वावलोकनाची वैशिष्ट्ये

Reddit  प्रीव्ह्यू अटी या अंतर्गत इतर डिजिटल वस्तू उपलब्ध करून देऊ शकते. कृपया सध्या कोणत्या इतर डिजिटल वस्तू उपलब्ध आहेत (कोणतीही असल्यास) हे पाहण्यासाठी  प्रीव्ह्यू अटी  याचे पुनरावलोकन करा.

4. तृतीय पक्षाचे अधिकार

या इकॉन अटींमध्ये किंवा (लागू असल्यास) स्पष्टपणे नमूद केल्याशिवाय, वापरकर्त्यांना डिजिटल वस्तूंमध्ये (त्यांच्याशी संबंधित कोणत्याही अवतार कला, साहित्य किंवा इतर कलाकृतींसह (एकत्रितपणे, “डिजिटल वस्तू आर्ट”)) कोणतीही मालमत्ता, स्वामित्व, बौद्धिक मालमत्ता, मालकी किंवा आर्थिक हितसंबंध नाहीत. प्रीव्ह्यू अटी.

काही डिजिटल वस्तू Reddit आणि तृतीय पक्ष परवानाधारक यांच्यातील सहयोगांचा परिणाम असू शकतात. तुमच्या डिजिटल वस्तूशी संबंधित कोणत्याही डिजिटल वस्तू आर्टमध्ये तृतीय पक्षाचे बौद्धिक संपदा हक्क (उदा. एखाद्या क्रिएटरकडून किंवा भागीदाराकडून परवानाकृत बौद्धिक संपदा हक्क) असल्यास (“तृतीय पक्ष हक्क”), तुम्ही समजता आणि सहमत होता की:

  • डिजिटल वस्तू आर्टमध्ये समाविष्ट केलेले आणि या इकॉन अटींमध्ये किंवा (लागू असल्यास) प्रीव्ह्यू अटी यांमध्ये नमूद केलेल्या परवान्याच्या आणि निर्बंधांच्या अधीन असलेले तृतीय पक्ष हक्क वगळता, तुम्हाला कोणत्याही प्रकारे कोणतेही तृतीय पक्ष हक्क वापरण्याचा अधिकार असणार नाही;

  • तृतीय पक्ष हक्कांच्या मालकाने दिलेल्या परवान्याच्या स्वरूपानुसार, Reddit ला डिजिटल वस्तू आर्ट वापरण्याच्या तुमच्या क्षमतेवर अतिरिक्त निर्बंध लागू करावे लागू शकतात; आणि

  • तृतीय पक्ष हक्कांमुळे डिजिटल वस्तू आर्टच्या वापरावर अतिरिक्त निर्बंध लागू असल्याचे Reddit ने तुम्हाला सूचित केल्यास, तुम्ही त्या निर्बंधांचे पालन कराल.

डिजिटल वस्तू आर्ट हे उल्लंघनाचा दावा बनल्यास (किंवा तसे होण्याची शक्यता आहे, असे Reddit ठरवल्यास), Reddit ला डिजिटल वस्तू आर्ट बदलण्याचा, डिजिटल वस्तू आर्टचा वापर सुरू ठेवण्याचा अधिकार मिळवण्याचा किंवा डिजिटल वस्तू आर्टवरील तुमचे परवानाकृत हक्क (लागू असल्यास, तुमच्या मर्यादित परवानाकृत हक्कांसह) समाप्त करण्याचा अधिकार आहे.

5. खाते निलंबन किंवा समाप्ती

 वापरकर्ता करार आणि आमच्या Reddit चे नियम यामध्ये नमूद केल्याप्रमाणे, तुम्ही आमच्या सेवांसाठी असलेल्या नियमांचे तसेच तुम्ही सहभागी होत असलेल्या स्वतंत्र समुदायाच्या नियमांचे पालन करणे आणि त्यांचे अनुपालन करणे आवश्यक आहे. असे करण्यात अयशस्वी ठरल्यास ते इकॉन अटींचे उल्लंघन ठरू शकते आणि त्यामुळे सेवांमधून किंवा विशिष्ट समुदायांमधून तात्पुरती किंवा कायमची बंदी घातली जाऊ शकते किंवा तुमच्या पोस्ट आणि टिप्पण्या काढून टाकल्या जाऊ शकतात. यामध्ये अशा समुदायांचाही समावेश आहे जिथे तुम्हाला सशुल्क सेवांच्या काही बाबी किंवा लाभांचा अ‍ॅक्सेस असू शकतो. अशा परिस्थितीत, तुम्ही सशुल्क सेवांचा लाभ गमावू शकता आणि या नुकसानीसाठी आम्ही तुम्हाला कोणतीही भरपाई देणार नाही.

6. तुमच्या स्वीकृती

सेवांद्वारे उपलब्ध करून दिलेल्या कोणत्याही सदस्यता, डिजिटल वस्तू किंवा इतर सशुल्क सेवांचा अ‍ॅक्सेस, खरेदी किंवा वापर करण्याच्या संदर्भात (एकत्रितपणे, “Reddit इकॉन वस्तू”) — तुम्ही असे प्रतिपादन करता, हमी देता, मान्य करता आणि सहमत होता की:

  • तुम्ही Reddit आणि समुदायाच्या नियमांचे पालन कराल – तुम्ही आमच्या वापरकर्ता करार, Reddit चे नियम आणि या इकॉन अटींमध्ये नमूद केलेल्या सेवांसाठीच्या आमच्या नियमांचे तसेच तुम्ही सहभागी होत असलेल्या वैयक्तिक समुदायांच्या नियमांचे पालन कराल आणि त्यांचे अनुपालन कराल;

  • Reddit इकॉन वस्तू पैसे किंवा कायदेशीर चलन नाहीत – कोणतीही Reddit इकॉन वस्तू पैसे किंवा कायदेशीर चलन नाही, तसेच तिचे कोणतेही आर्थिक मूल्य किंवा रोख समतुल्य मूल्य नाही; तसेच ती रोख किंवा ठेव खाते नाही आणि Reddit ची मंजुरी असल्याशिवाय सेवांबाहेरील वास्तविक जगातील कोणत्याही रकमेच्या पैशांसाठी, आर्थिक मूल्यासाठी किंवा इतर कोणत्याही वस्तू किंवा सेवांसाठी तिची पूर्तता करता येत नाही; तसेच ती कोणत्याही प्रकारचे चलन किंवा मालमत्ता नाही;

  • तुम्ही बहुतेक Reddit इकॉन वस्तू हस्तांतरित किंवा विकू शकत नाही – या इकॉन अटींमध्ये किंवा (लागू असल्यास)  प्रीव्ह्यू अटी यांमध्ये स्पष्टपणे नमूद केलेले मर्यादित अपवाद वगळता, तुमच्या Reddit इकॉन वस्तू (तुमच्या मर्यादित परवानाकृत हक्कांसह) आमच्या परवानगीशिवाय विकता, व्यापार करता, अदलाबदल करता, हस्तांतरित करता, विनिमय करता, विक्रीसाठी ऑफर करता किंवा सेवांच्या किंवा तुमच्या खात्याच्या बाहेर अन्यथा वापरता येणार नाहीत;

  • Reddit इकॉन वस्तूंवरील तुमचे हक्क मर्यादित आहेत – या इकॉन अटींमध्ये स्पष्टपणे नमूद केलेल्या मर्यादित अपवादांना वगळता, Reddit इकॉन वस्तूंच्या बदल्यात कोणताही मोबदला देण्यात आला किंवा देऊ करण्यात आला असला तरी, Reddit इकॉन वस्तूंमध्ये तुमची कोणतीही मालमत्ता, स्वामित्वाधिकार, बौद्धिक संपदा, मालकीहक्क किंवा आर्थिक हक्क, हक्काधिकार किंवा अन्य कोणताही स्वामित्वाधिकार नाही; त्याऐवजी, या इकॉन अटींनुसार Reddit इकॉन वस्तूंचा अ‍ॅक्सेस घेण्यासाठी आणि त्यांचा वापर करण्यासाठी तुम्हाला परवाना दिला जातो;

  • तुम्ही कोणत्याही Reddit इकॉन वस्तूचे व्यापारीकरण करणार नाही – आमच्या परवानगीशिवाय आणि, लागू असल्यास, कोणत्याही तृतीय पक्ष हक्कधारकाच्या परवानगीशिवाय, तुम्ही कोणत्याही Reddit इकॉन वस्तूला (कोणत्याही डिजिटल वस्तू आर्टसह) परवाना देणार नाही, उपपरवाना देणार नाही, विकणार नाही, पुनर्विक्री करणार नाही, हस्तांतरित करणार नाही, हक्क सोपवणार नाही, वितरित करणार नाही किंवा अन्यथा तिचे व्यावसायिक शोषण करणार नाही किंवा ती कोणत्याही तृतीय पक्षाला उपलब्ध करून देणार नाही (ट्रेडमार्क किंवा ब्रँड म्हणून किंवा व्युत्पन्न कृती म्हणून); तुम्ही कोणत्याही Reddit इकॉन वस्तूमध्ये कोणताही ट्रेडमार्क, कॉपीराइट किंवा इतर कोणतेही बौद्धिक संपदा हक्क नोंदवणार नाही किंवा नोंदवण्याचा प्रयत्न करणार नाही; तुम्ही कोणत्याही Reddit इकॉन वस्तूचे विपणन किंवा विक्री करणार नाही, तसेच तुमच्या वस्तू किंवा सेवांचे किंवा इतर कोणत्याही तृतीय पक्षाच्या वस्तू किंवा सेवांचे विपणन किंवा विक्री करण्यासाठी कोणतीही Reddit इकॉन वस्तू वापरणार नाही; तसेच Reddit किंवा कोणत्याही तृतीय पक्ष हक्कधारकाचे कोणतेही ट्रेडमार्क, तपशील, हमी किंवा अस्वीकरण किंवा कोणतीही बौद्धिक संपदा किंवा स्वामित्वविषयक सूचना काढून टाकणार, हटवणार, बदलणार किंवा अस्पष्ट करणार नाही; आणि Reddit च्या नावाचा, ट्रेडमार्कचा किंवा लोगोचा वापर करण्यासह, कोणत्याही प्रकारे Reddit कडून तुमचे समर्थन केले जाते किंवा तुम्ही Reddit शी संलग्न आहात, असे सांगणार नाही किंवा तसा अर्थ सूचित करणार नाही;

  • तुम्ही Reddit ने निश्चित केलेल्या कोणत्याही मर्यादा किंवा सुरक्षा उपायांचे उल्लंघन करणार नाही – तुम्ही Reddit इकॉन वस्तूंमध्ये किंवा सशुल्क सेवांच्या इतर कोणत्याही घटकामध्ये (यामध्ये कोणतेही उपकरण, सॉफ्टवेअर किंवा प्रक्रिया वापरून केलेल्या कृतीचाही समावेश आहे) व्यत्यय आणणार नाही, हस्तक्षेप करणार नाही, सुरक्षेचे उल्लंघन करणार नाही किंवा अनधिकृत अ‍ॅक्सेस मिळवण्याचा प्रयत्न करणार नाही तसेच, आमच्या परवानगीशिवाय, आम्ही निश्चित केलेल्या कोणत्याही दाव्याशी, खरेदीशी, पात्रतेशी, हस्तांतरणाशी, दराशी, विनिमयाशी, सुरक्षेशी किंवा इतर कोणत्याही मर्यादेशी उल्लंघन करून किंवा अन्यथा या इकॉन अटींचे उल्लंघन करून कोणतीही Reddit इकॉन वस्तू मिळवणार किंवा तिची विल्हेवाट लावणार नाही (यामध्ये आमच्या सेवांना कोणत्याही प्रकारे नुकसान पोहोचवू शकणारी, नष्ट करू शकणारी, त्यात व्यत्यय आणू शकणारी, त्यांना अक्षम करू शकणारी, त्यांची कार्यक्षमता कमी करू शकणारी, त्यांच्यावर अतिभार आणू शकणारी किंवा अन्यथा कोणत्याही प्रकारे त्यांना अडथळा आणू शकणारी किंवा हानी पोहोचवू शकणारी कोणतीही पद्धत समाविष्ट आहे) तसेच, सेवांचे आणि Reddit इकॉन वस्तूंचे संरक्षण करण्यासाठी लागू केलेल्या कोणत्याही सुरक्षा साधनाला, संरक्षणाला किंवा तांत्रिक उपायाला तुम्ही बगल देणार नाही, त्याचे उल्लंघन करणार नाही, ते टाळणार नाही, ते काढून टाकणार नाही, ते निष्क्रिय करणार नाही, त्याची कार्यक्षमता कमी करणार नाही, त्याचे डिक्रिप्शन करणार नाही किंवा अन्यथा कोणत्याही प्रकारे त्याला चुकवणार नाही. तसेच, तुम्हाला हे समजते की Reddit या मर्यादा आणि अटी निश्चित करते, जेणेकरून redditors साठी सेवा आनंददायी राहतील आणि बॉट, रोबोट, पार्सर, स्पायडर, स्क्रिप्ट, प्रोग्राम, प्रक्रिया, स्पॅम आणि इतर प्रकारचे ऑटोमेशन, तसेच फसवणूक, बेकायदेशीर अ‍ॅक्टिव्हिटी आणि आमच्या वापरकर्ता करार, Reddit चे नियम  आणि या इकॉन अटींचे इतर उल्लंघन रोखता येईल;

  • तुम्ही Reddit इकॉन वस्तू किंवा सेवांमधून डेटा काढणार नाही – आमच्या परवानगीशिवाय, तुम्ही Reddit इकॉन वस्तू किंवा सेवांमधून किंवा त्यांच्याशी संबंधित कोणताही डेटा, मजकूर, अहवाल किंवा इतर कोणतीही सामग्री (यामध्ये वेब स्क्रॅपिंग, वेब हार्वेस्टिंग किंवा इतर डेटा काढण्याच्या पद्धतींद्वारे केलेल्या कृतींचाही समावेश आहे) काढणार, कॉपी करणार, प्रतिकृती तयार करणार, डाउनलोड करणार, कॅशे करणार, प्रकाशित करणार, प्रसारित करणार किंवा अन्यथा पुनरुत्पादित, हस्तांतरित, वितरित, संग्रहित, प्रसारित, एकत्रित किंवा अन्यथा (संपूर्णपणे किंवा अंशतः) वापरणार नाही;

  • तुम्ही कायद्याचे पालन कराल आणि सारासार विचार कराल – फसवणुकीने मिळवलेल्या, चोरी केलेल्या, परवानगीशिवाय घेतलेल्या किंवा अन्यथा बेकायदेशीररीत्या मिळवलेल्या कोणत्याही Reddit इकॉन वस्तूचे संपादन किंवा विल्हेवाट लावण्यासाठी तुम्ही सेवांचा वापर करणार नाही किंवा तसा प्रयत्न करणार नाही; कोणत्याही Reddit इकॉन वस्तूचा, सेवांच्या आत किंवा बाहेर, कोणत्याही बेकायदेशीर उद्देशासाठी (यामध्ये बाजारपेठेतील हेराफेरी, पैशांचे गैरव्यवहार, फसवणूक किंवा इतर कोणताही गुन्हा यांचा समावेश आहे), कोणत्याही प्रकारच्या पैज, सट्टेबाजी किंवा जुगारासाठी किंवा Reddit च्या प्रतिबंधित वस्तू किंवा सेवांशी संबंधित व्यवहारांविरुद्धच्या धोरण अंतर्गत प्रतिबंधित असलेल्या वस्तू किंवा सेवांशी संबंधित कोणत्याही व्यवहाराच्या संदर्भात वापर करणार नाही, आणि तुमच्या कोणत्याही Reddit इकॉन वस्तूच्या संपादनामुळे किंवा विल्हेवाट लावल्यामुळे उद्भवणाऱ्या लागू कायद्यांचे, करासंबंधीच्या दायित्वांसह, पालन कराल; आणि

  • तुम्ही इतर कोणालाही या इकॉन अटी हा करार  यांचे उल्लंघन करण्यास प्रवृत्त करणार नाही – वर नमूद केलेल्या किंवा अन्यथा या इकॉन अटींमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही प्रतिनिधित्वांचे, हमींचे, स्वीकृतींचे आणि करारांचे उल्लंघन करण्यास तुम्ही कोणत्याही तृतीय पक्षाला प्रवृत्त करणार नाही किंवा तसे करण्याचा प्रयत्न करणार नाही.

वरील नियमांचे पालन करण्यात आणि त्यांचे अनुपालन करण्यात अपयश आल्यास, ते या इकॉन अटींचे उल्लंघन ठरू शकते आणि त्याचा परिणाम Reddit किंवा विशिष्ट समुदायांमधून तात्पुरती किंवा कायमस्वरूपी बंदी घालण्यात किंवा Reddit इकॉन वस्तूंचा तुमचा अ‍ॅक्सेस काढून घेण्यात येऊ शकतो. अशा परिस्थितीत, तुम्ही Reddit इकॉन वस्तूंचे लाभ गमावू शकता आणि या नुकसानीसाठी आम्ही तुम्हाला कोणतीही भरपाई देणार नाही.

7. तुम्ही या जोखमी स्वीकारता

कोणत्याही Reddit इकॉन वस्तूचा अ‍ॅक्सेस घेणे, तिची खरेदी करणे आणि तिचा वापर करण्याच्या संदर्भात, तुम्ही खालील जोखमींची जाणीव असल्याचे मान्य करता आणि त्या जोखमींची जबाबदारी स्वीकारता, तसेच त्यातून होणाऱ्या किंवा त्यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही दायित्वासाठी Reddit ला जबाबदार धरणार नाही:

  • तुमच्या खात्याचा अ‍ॅक्सेस गमवणे – तुम्हाला परतावा देण्याची किंवा अन्यथा तुमच्या कथित नुकसानीची भरपाई करण्याची कोणतीही आवश्यकता नसताना, तुम्ही या इकॉन अटींचे उल्लंघन कराल किंवा केले आहे असा आम्हाला संशय असल्यास, Reddit सेवा प्रतिबंधित करू शकते, बंद करू शकते किंवा अन्यथा बदलू शकते किंवा तुमचे खाते निलंबित आणि/किंवा समाप्त करू शकते (उदाहरणार्थ, सेवांच्या आत किंवा बाहेर कोणत्याही Reddit इकॉन वस्तूचा कोणत्याही बेकायदेशीर उद्देशासाठी वापर करणे); आणि तुमचे खाते निलंबित किंवा समाप्त केले असल्यास, सेवांवरील तुमच्या Reddit इकॉन वस्तूंचा अ‍ॅक्सेस तुम्ही तात्पुरता किंवा कायमस्वरूपी गमवू शकता किंवा त्यांचा वापर करू शकणार नाही;

  • reddit वापरकर्त्यांसोबतच्या समस्या – Reddit केवळ तृतीय पक्षाच्या सशुल्क सेवांच्या विक्रीस सुलभता प्रदान करते आणि अन्यथा Reddit इकॉन वस्तू किंवा इतर कोणत्याही वस्तू किंवा सेवांसाठी तुमच्या आणि redditors किंवा तृतीय पक्षांमधील व्यवहारांसाठी मार्केटप्लेस चालवत नाही किंवा अशा कोणत्याही व्यवहारांना सुलभता प्रदान करत नाही, तसेच तुमच्या आणि Reddit वापरकर्त्यांना किंवा तृतीय पक्षांमधील कोणत्याही व्यवहारांशी संबंधित कोणतेही आश्वासन किंवा हमी Reddit देत नाही आणि त्यासाठी Reddit जबाबदार नाही (व्यवहारांशी संबंधित कोणत्याही विवादांसह); तसेच तुमच्या व्यवहारातील प्रतिपक्षाची ओळख, तुमच्या व्यवहाराचे कारण किंवा त्या व्यवहाराबाबत तुमचे किंवा प्रतिपक्षाचे समाधान याची पुष्टी करण्यासाठी Reddit जबाबदार नाही (तुम्ही अशा व्यवहारांमध्ये केवळ तुमच्या स्वतःच्या जोखमीवर सहभागी होता);

  • मार्केटप्लेस संदर्भातील समस्या – Reddit अशा कोणत्याही तृतीय पक्ष मार्केटप्लेस किंवा सेवांना मान्यता देत नाही किंवा त्यांची जबाबदारी घेत नाही, ज्या तृतीय पक्षांना Reddit इकॉन वस्तू विकण्याची, हस्तांतरित करण्याची किंवा अन्यथा वापरण्याची परवानगी देतात, आणि तुमच्याद्वारे अशा मार्केटप्लेस किंवा सेवांचा कोणताही अनधिकृत वापर हा या इकॉन अटींचे उल्लंघन आहे; आणि

  • तुम्हाला कोणताही परतावा न देता किंवा तुमच्या कथित नुकसानीची अन्यथा भरपाई न करता – Reddit स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार Reddit इकॉन वस्तूंमध्ये बदल करू शकते आणि अशा बदलांमुळे काही किंवा सर्व Reddit इकॉन वस्तू कमी किंवा अधिक सामान्य, इष्ट, प्रभावी किंवा कार्यक्षम होऊ शकतात, जरी अशा बदलांचा Reddit इकॉन वस्तूच्या मूल्यावर किंवा उपयुक्ततेवर किंवा विशिष्ट Reddit इकॉन वस्तू मिळवण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो (उदाहरणार्थ, इतर Reddit इकॉन वस्तू वापरण्यासाठी आवश्यक असलेल्या Reddit इकॉन वस्तूंची संख्या वाढवली किंवा कमी केली जाऊ शकते आणि कोणत्याही Reddit इकॉन वस्तूच्या रिडेम्प्शनवर कोणत्याही वेळी निर्बंध लागू केले जाऊ शकतात); Reddit हमी देत नाही की Reddit इकॉन वस्तू कोणत्याही विशिष्ट कालावधीसाठी सातत्याने उपलब्ध करून दिल्या जातील आणि कायद्याने परवानगी दिलेल्या कमाल मर्यादेपर्यंत, कोणत्याही कारणास्तव किंवा कोणतेही कारण नसताना, आपल्या स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार आणि तुम्हाला कोणतीही आगाऊ सूचना न देता किंवा कोणतेही दायित्व न स्वीकारता, कोणत्याही Reddit इकॉन वस्तूवर नियंत्रण ठेवण्याचा, तिचे नियमन करण्याचा, त्यात बदल करण्याचा, तिला निलंबित करण्याचा, काढून टाकण्याचा, समाप्त करण्याचा, तिची तरतूद थांबवण्याचा किंवा तिच्यासाठी समर्थन बंद करण्याचा अधिकार Reddit राखून ठेवते; आणि तुम्ही समजता की, कोणत्याही Reddit इकॉन वस्तू जमा करताना, सेवांवर त्यांची सातत्याने उपलब्धता किंवा त्यांच्या गुणवत्तेत किंवा मूल्यात कोणतीही कायमस्वरूपी टिकून राहणारी स्थिती अथवा भविष्यातील वाढ यावर तुम्ही अवलंबून राहू नये.

वरील जोखमींची जबाबदारी स्वीकारणे ही Reddit इकॉन वस्तू अ‍ॅक्सेस करण्याची आणि त्यांचा वापर करण्याची एक अट आहे, हे तुम्हाला समजते. तुम्ही या जोखमींची जबाबदारी स्वीकारण्यास सहमत नसल्यास, तुम्हाला कोणत्याही Reddit इकॉन वस्तू अ‍ॅक्सेस करण्याची, खरेदी करण्याची किंवा त्यांचा वापर करण्याची आमची परवानगी नाही.

8. संकीर्ण

आमचा  वापरकर्ता करार  या संदर्भाद्वारे या इकॉन अटींमध्ये समाविष्ट केला जातो आणि त्यांचा एक भाग बनतो, आणि वापरकर्ता करार मधील कोणत्याही अटींचा या इकॉन अटींशी विसंगत असल्यास, Reddit इकॉन वस्तूंचा तुमच्याकडून अ‍ॅक्सेस, खरेदी आणि वापर यासंदर्भात या इकॉन अटी लागू होतील.

⌂ 换网址